मार्क 6

1येशू तेथून निघाला आणि आपल्या गावी गेला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. 2शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या माणासाला ही शिकवण कोठून मिळाली? आणि त्याला कोणते ज्ञान देण्यात आले आहे की, यासारखे चमत्कार त्याच्या हातून केले जातात? तो सुतार नाही काय? 3तो मरीयेचा मुलगाच ना? तो याकोब, योसे, यहूदा आणि शिमोनाचा भाऊ नव्हे काय? व या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय?” त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला. 4मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांचा सन्मान होत नाही असे नाही पण त्याच्या गावात, शहरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात होत नसतो.” 5आणि तेथे त्याला चमत्कार करता आला नाही. फक्त त्याने काही रोगी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. 6नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला. 7त्याने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठविले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला. 8त्याने त्यांना आज्ञा दिल्या की, “काठीशिवाय प्रवासासाठी त्यांनी काही घेऊ नये. भाकर पिशवी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका. 9त्यांनी वहाणा घालाव्यात पण जास्तीचा अंगरखा नको. 10तो त्यांना म्हणाला, ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडेपर्यंत राहा. 11आणि ज्या ठिकणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत ते गाव तुम्ही सोडून जा. आणि त्यांच्याविरूद्ध साक्ष म्हणून तुमच्या पायाची धूळ तेथेच झटकून टाका.” 12मग शिष्य गेले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी उपदेश केला. 13त्यांनी पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना जैतुनाचे तेल लावून त्यांना बरे केले. 14हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ आहे.” 15इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काही जण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.” 16परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तो मरणातून उठविला गेला आहे.” 17कारण हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती. त्याचा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले. त्या कारणामुळे त्याने असे केले. 18योहान हेरोदाला सांगत असे की, “तुझ्या भावाच्या पत्नीशी असे लग्न करणे तुला योग्य नाही.” 19याकरिता हेरोदीयाने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्याला ठार मारण्याची संधी पाहात होती. परंतु ती त्याला मारु शकली नाही. 20कारण हेरोद योहानाला भीत असे. हेरोदाला माहीत होते की, योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे, म्हणून तो त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे. 21मग एके दिवशी संधी आली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालीलातील प्रमुख लोकांना मेजवानी दिली. 22हेरोदीयाची मुलगी मेजवानीच्या ठिकाणी आली व तिने नाच केला आणि हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदीत केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” 23तो गंभीरपणे शपथ वाहून म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मगशील ते मी तुला देईन.” 24ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.” 25आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.” 26राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्याला तिला नकार द्यावा असे वाटले नाही. 27तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठविले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. 28ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. 29योहानाच्या शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते तेथे आले. त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले. 30प्रेषित येशूभोवती जमले. त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्याला सांगितले. 31नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.” 32तेव्हा ते सर्वजण नावेत बसून निर्जन ठिकाणी गेले. 33परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व येशू तेथे येण्याअगोदरच ते तेथे पोहोंचले. 34येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला व त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला. 35या वेळेपर्यंत बराच उशीर झाला होता आणि (दिवस मावळतीला आला होता) मग त्याचे शिष्य त्याच्याकडे आले व म्हणाले, “ही निर्जन जागा आहे व बराच उशीर झाला आहे. 36लोकांना पाठवून द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.” 37परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्याला म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे दीनारांच्या भाकरी विकत आणाव्या काय?” 38तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा, की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” त्यांनी पाहिले तेव्हा ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” 39येशूने शिष्यांना सांगितले, “सर्व लोकांना गटागटाने हिरवळीवर बसायला सांगा.” 40तेव्हा सर्व लोक गटागटाने बसले. प्रत्येक गटात पन्नास ते शंभर लोक होते. 41येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले. त्याने त्याचे वाटे केले. त्याने तेथे आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले. भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या. दोन मासेसुद्धा वाटून दिले. 42मग ते सर्व जेवून तृप्त झाले. 43त्यांनी भाकरीच्या व माशांच्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या भरल्या. 44आणि जे पुरुष जेवले, त्यांची संख्या पाच हजार होती. 45नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगितले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले. 46त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. 47संध्याकाळ झाली तेव्हा नाव सरोवराच्या मध्यभागी होती आणि जमिनीवर येशू एकटाच होता. 48मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता व तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला. 49जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. 50कारण त्या सर्वांनी त्याला पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भीऊ नका, मी आहे,” 51नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. 52कारण त्यांना भाकरीच्या संदर्भातील चमत्कार समजलाच नव्हता आणि त्यांची मने कठीण झाली होती. 53त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतच्या किनाऱ्याला आले व नाव (होड़ी) बांधून टाकली. 54ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले. 55लोक हे सागण्यासाठी इतर सर्व लोकांकडे पळाले आणि आजाऱ्यांना खाटेवर घालून जेथे तो आहे असे ऐकले तेथे घेऊन जाऊ लागले. 56खेड्यात, गावात किंवा शेतात आणि, जेथे बाजाराच्या जागी कोठे तो गेला तेथे लोकांनी आपल्या आजारी माणसांना आणून ठेवले. त्यांनी त्याला फक्त त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श करू देण्याची विनंति केली. ज्यांनी त्याला स्वर्श केला ते बरे झाले.

will be added

X\